उन्हाच्या झळा आणि घराची काळजी.
उन्हाच्या झळा आणि घराची काळजी..!
“हिवाळ्यातली थंडी अनुभवल्याशिवाय उन्हाळ्यातल्या उबेचे महत्त्व, तिच्यातला गोडवा कसा जाणवणार.”
― जॉन स्टेनबेक.
“उन्हाळ्यामध्ये कीटकांचे साम्राज्य जास्त पसरते.”
― ॲडम झॅगावेस्की.
“उन्हाळा हा नेहमीच अतिशय वाईट ऋतू असतो. प्रत्येकचजण नेहमी हिवाळ्याविषयी तक्रार करतो, पण हिवाळ्यामध्ये सगळे काही अगदी सोपे होते, तुम्ही फक्त केवळ बाहेर पडत नाही. उन्हाळा मात्र नेहमी जेथे त्याची गरज नसते तिथे डोकावतो.”
― कॅथरीना व्हर्मेट.
“विचार करा एक खोली आहे
जिला सहा भिंती आहेत व एक छप्पर आहे
दोन मोठ्या खिडक्या आहेत
दोन मोठे आरसे आहेत
दोन फिकट पांढऱ्या रंगाच्या भिंती आहेत ज्या सूर्यप्रकाशाने रंगवण्यात आल्या असाव्यात असा गैरसमज सहज होऊ शकतो.
प्रत्येक सकाळी, धगधगता सूर्य खोलीमध्ये प्रवेश करतो
व प्रत्येक कोपऱ्याला तो अगदी ओसंडून वाहेपर्यंत भरून टाकतो -
खिडक्या सूर्यप्रकाशाची देवाण-घेवाण करतात
(यातून सुटका व्हावी किंवा थोडा आराम मिळावा यासाठी एखादा दरवाजाही नसतो).
आरसे झगमगतात व डोळे दिपून जातात
सर्व भिंती स्वतःच्याच आगीत पेटून उठलेल्या असतात.
त्या गुदमरवणाऱ्या जागेत, तुमच्या नावाचा एक टेबल फॅन असतो.
हा आहे कोलकात्याचा उन्हाळा, तुमच्यासाठी.”
― देवकी तोडी.
जगाच्या वेगवेगळ्या भागातील चार महान लेखकांनी एकाच विषयाबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे, म्हणजेच उन्हाळा, शेवटचे अवतरण हिमालयाच्या पर्वतरांगा सोडल्यास भारतातील बहुतेक भागांसाठी आता खरे आहे!! तुम्ही जोपर्यंत हा लेख वाचत असाल तेव्हा उन्हाळा जवळपास संपत आला असेल. आपल्या देशामध्ये उन्हाळ्याच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनचे अधिकृतपणे आगमन होते व आपण मे महिन्याच्या तिसर्या आठवड्याच्या शेवटाकडे पोहोचलो आहोत, पण काही हरकत नाही. कारण बऱ्याच काळानंतर मी इमारती बांधण्याच्या पैलूविषयी काहीतरी लिहीत आहे, त्यामुळे माझ्यातला स्थापत्य अभियंता अजूनही जागा आहे म्हणून मी जास्त आनंदी आहे, अर्थात काही अंशी. मी थेट घरांविषयी, अधिक नेमकेपणाने सांगायचे तर त्यांची देखभाल किंवा समस्यांविषयी लिहीतोय ज्या घराचा ताबा घेतल्यानंतर त्यात राहणाऱ्या व्यक्तींना जाणवतात व बरेचदा या प्रोसेसमध्ये बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार सुद्धा केली जाते. आपण सगळे पावसाळ्यात होणाऱ्या घरातील समस्या जाणतो उदाहरणार्थ पाणी झिरपणे, गळणे, शॉर्ट सर्किट होणे, पाणी तुंबणे व इतरही समस्या असतात ज्या मुसळधार पावसामुळे होतात, परंतु आता आपल्यापैकी बहुतेकांना माहिती आहे की यातल्या बहुतेक समस्यांची सुरुवात उन्हाळ्यात होते व काहींची सुरुवात तर हिवाळ्यातही होते. मला खात्री आहे की अगदी प्रशिक्षित स्थापत्य अभियंत्यांनाही त्याविषयी फारसे माहिती नसते म्हणूनच हा लेखप्रपंच. आजकाल ज्याप्रकारे स्थापत्य अभियंते घडतात तो एक विनोदाचाच भाग आहे असे शिक्षण क्षेत्राविषयी पूर्णपणे आदर राखत सांगावेसे वाटते. एखाद्या तरुणाकडे स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी असणे ही एक गोष्ट आहे व ती प्रत्यक्ष काम करताना योग्य कारणासाठी वापरण्याची क्षमता (व इच्छा) असणे दुसरी गोष्ट आहे व ही दुसरी गोष्टच बांधकाम उद्योगात (म्हणजेच रिअल इस्टेटमध्ये) आजकाल दिसत नाही, जो चिंतेचा विषय आहे!
तर, आता तत्वज्ञान (म्हणजे वैताग) पुरे झाले, परंतु मला आनंद होत आहे की हे असे शेअरिंग आहे ज्याचा लोक कुठेतरी वापर करू शकतील व हे 2025 मधील उन्हाळ्याविषयी आहे, आता तुम्ही म्हणाल की त्यात इतके काय विशेष आहे, तर मला तुम्हाला सांगावेसे वाटते की या वर्षीचा उन्हाळा गेल्या १०० वर्षातील सर्वाधिक उष्णतेचा होता, विशेषतः भारतीय उपखंडात. हा कदाचित जागतिक तापमानवाढीचा परिणाम असेल किंवा जंगलतोडीचा किंवा शहरीकरणाचा किंवा इतर कसलाही परंतु तो आपला विषय नाही. आपला विषय आहे या तीव्र उन्हाळ्याचा आपल्या इमारतींवरील परिणाम, विशेषतः घरांवर किंवा सदनिकांवर. इथे पुन्हा बरेच जण विचारतील की, उन्हाळ्यामुळे काँक्रिटच्या घरांवर काय परिणाम होऊ शकतो, हा नेहमीप्रमाणेच काही बांधकाम व्यावसायिकांचाच आरोप दुसऱ्यांवर ढकलण्याचा खेळ असावा . तर तुम्ही तुमची मते ठरवण्यासाठी मुक्त आहात ज्याप्रमाणे मी माझी मते मांडण्यासाठी मुक्त आहे. परंतु इमारतींविषयी काही मूलभूत तथ्ये जाणून घेऊ कारण ती अभियंत्रिकी आहे किंवा ते विज्ञान आहे व ते आपल्या मतांनुसार नाही तर तथ्यानुसार व तर्कानुसार चालते. पण दुर्दैवाने घरांचे ग्राहक तसेच बांधकाम व्यावसायिक त्या बाबतीत कच्चे आहेत. त्याआधी मला तुम्हाला या विषयाची पार्श्वभूमी द्यायची आहे किंवा मला हे सांगायची गरज का वाटली याचे कारण सांगणार आहे. क्रेडाईच्या (विकासकांची संघटना) एका मेळाव्यामध्ये एक अतिशय ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक मला भेटले व त्यांच्या नव्याने बांधलेल्या एका प्रकल्पामध्ये टॉयलेटच्या भिंतीच्या टाईल्स पडणे किंवा सैल होणे अशी समस्या जाणवत असल्याचे त्यांनी मला सांगितले व ज्या सदनिकांना ही समस्या जाणवत होती त्यांची संख्या लक्षणीय होती, जवळपास २०० हून अधिक सदनिकांना ही समस्या जाणवत होती व आता यावर तोडगा काय काढायचा याची त्यांना काळजी पडली होती. त्याचप्रमाणे आमच्या पूर्ण झालेल्या काही प्रकल्पांमध्ये तसेच माझ्या ओळखीच्या वर्तुळामध्ये काही इमारतींमध्ये गच्चीच्या पृष्ठभागाच्या फरशा/सिमेंटच्या वॉटरप्रूफिंगचा थर वर आला आहे व त्याला तडे दिसून येऊ लागले आहेत. त्यानंतर आमच्या अलिकडेच पूर्ण झालेल्या एका प्रकल्पातील सदनिकाधारकाने आमच्या सेल्सच्या चमूशी प्रचंड हुज्जत घातली की त्याच्या हॉलमधील पीओपीच्या (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) सिलिंगचा थर खाली पडला आहे (तो केवळ एक थर होता, खरेतर कुणालाही इजा होईल एवढे काहीही गंभीर नव्हते) व त्याच्या सदनिकेमध्ये तळाशी भिंतीला लागून असलेल्या टाईल्सही (फ्लोरिंगच्या शेवटी भिंतीला लागून असलेला टाईल्सचा पट्टा) सैल झाल्या आहेत व या पट्ट्यातील दोन/तीन टाईल्स निघाल्या आहेत व आमच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार ग्राहकाने केली, आम्ही पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतोय वगैरे बोलला, जे मी समजू शकतो. मला खात्री आहे की आजूबाजूलाही अशा घटना घडलेल्या असतील परंतु मी म्हटल्याप्रमाणे रिअल इस्टेट क्षेत्रातला सर्वात “कमकुवत दुवा” म्हणजे डेटा व या उद्योगाचा ज्ञानावर विश्वास नसणे, म्हणूनच अशा घटना/प्रकरणे कधीच एका सामायिक मंचापर्यंत पोहोचत नाहीत,
म्हणूनच हा लेख लिहीत आ
हे सगळे तापमानामध्ये अचानक वाढ होण्याशी संबंधित आहे व ज्याप्रमाणे वैद्यकीय व्यवसायामध्ये डॉक्टरांच्या
निदानाला सर्वाधिक महत्त्व असते, त्याचप्रमाणे इमारतीच्या बांधकामामध्येही कोणत्याही इमारतीच्या देखभालीच्या समस्येचे कारण समजणे तितकेच महत्त्वाचे असते. एक म्हणजे, समस्येवर तोडगा काढण्यासाठी तुम्हाला त्यामागचे कारण माहिती असले पाहिजे व दुसरे म्हणजे, तरच तुम्ही त्यावर तोडगा काढून तुमच्या पुढील प्रकल्पांमध्ये ही समस्या होणार नाही याची काळजी घेऊ शकता. तापमानाच्या पातळीमध्ये तीव्र वाढ होणे हे बांधकामासंदर्भातील वरील समस्यांचे मूळ कारण आहे जे आपण टाळू शकतो व त्यावर उपायही करू शकतो. इथेही पुन्हा अनेक लोक म्हणतील, की पावसामुळे गळणे किंवा ओल लागणे हे ते समजून घेऊ शकतात, परंतु उन्हाळ्यातील उष्णता त्यासाठी कशी जबाबदार असते, तर मी तुम्हाला समजून सांगतो. पाणी झिरपणे व ओल लागण्याची बिजे ही उन्हाळ्यातच पेरली जातात व उन्हाळा जेवढा तीव्र असेल तेवढा येत्या पावसाळ्यामध्ये बांधकामामध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते! आपल्या इमारतींची रचनाही आपल्या शरीराप्रमाणेच असते, इमारतींचे खांब व स्तंभ आपल्या हाडांप्रमाणे असतात, जे आपल्या शरीराला आधार देतात. आपले स्नायू भिंतींसारखे असतात किंवा इमारतीच्या गवंडीकामासारखे असतात व आपली त्वचा आपल्या घरांच्या भिंतींवर केलेल्या प्लॅस्टरसारखी असते जी विविध भागांना वस्तुमान किंवा आकारमान देते. आपली त्वचा उन्हाळ्यातील तीव्र उकाड्यामुळे जशी कोरडी होते व तिला तडे जातात, अगदी त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये तीव्र तापमानामुळे ताण येऊन प्लॅस्टरलाही तडे जातात. त्याचप्रमाणे पुण्यासारख्या शहरामध्ये, एकाच दिवसात दुपारच्या ४१ अंशांवरून रात्री तापमानामध्ये घट होऊन ते २० अंशांपर्यंत पोहोचते, यामुळे आपल्या घरांच्या संपूर्ण रचनेवर औष्णिक ताण निर्माण होतो. यामागचे साधे विज्ञान म्हणजे, प्रत्येक पदार्थाची तापमानातील फरक सहन करण्यासाठी ताणले जाण्याची व आकुंचनाची स्वतःची एक प्रवृत्ती असते व एवढे भौतिकशास्त्र आपण १०व्या इयत्तेत शिकलो आहोत, बरोबर? आपले घर स्टील, काँक्रिट, विटा, टाईल्स, सिमेंटचा मसाला (प्लास्टर), पाईप वगैरे साहित्य वापरून बांधले जाते, व हे सगळे साहित्य त्यांना जोडणारे काही घटक वापरून जोडलेले असते. हे सर्व साहित्य आपापल्या प्रमाणात प्रसरण व आकुंचन पावते व ते अगदी नैसर्गिक आहे. परंतु जेव्हा तापमानातील फरक अतिशय जास्त असतो जो यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जाणवतोय, तेव्हा प्रकरण व आकुंचन होण्याचे प्रमाणही वाढते ज्यामुळे वरील सर्व साहित्याच्या सांध्यांमध्ये तडे जातात व प्लास्टरच्या पृष्ठभागावर तडे गेले, तर टाईल्स ज्या एकप्रकारे भिंतीला चिटकवलेल्या आहेत त्या पडू शकतात, प्लास्टर केलेल्या पृष्ठभागावरून औष्णिक ताणामुळे पीओपी गळून पडतो व भिंतींवरच्या रंगाचेही तसेच होते, ज्याला आपण बांधकामाचा दर्जा निकृष्ट असणे किंवा ते सदोष असणे असे म्हणतो.
सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे कोणत्याही प्रकारे बांधकामातील दोष नाहीत तसेच त्यामुळे बांधकामाला कोणताही मोठा किंवा धोकादायक अपाय होत नाही, कारण बांधकामाची रचना करताना हे सगळे घटक विचारात घेतलेले असतात, परंतु उष्णतेमुळे पृष्ठभागाला कुठेतरी थोडाफार अपाय होणार आहे. यासाठी आपण काय करू शकतो, काय झाले आहे व का झाले आहे हे समजून घेऊ शकतो व काही प्लास्टर करणारे घटक वापरून जे सांधण्याचे काम करतील या त्रुटी दुरुस्त करू शकतो. नवीन बांधकामासंदर्भात या गोष्टी लक्षात ठेवा, याच कारणामुळे मी कधीही खोल्यांच्या छतासाठी नेहमीच्या प्लास्टरची शिफारस करत नाही, कारण पीओपीचा थर उष्णतेमुळे पडला तरी घरात राहणाऱ्या लोकांना कोणताही शारीरिक अपाय होणार नाही. परंतु जर नेहमीचे प्लास्टर पडले, तर पडणाऱ्या भागाच्या वजनामुळे ते काही वेळा धोकादायक असू शकते, जे पीओपीसंदर्भात नसते. या औष्णिक ताणामुळे भिंतीच्या टाईल्स/बाहेरील आवरणाचे साहित्य भिंतींमधून बाहेर येऊ शकते व हे टाळण्यासाठी या टाईल बसवताना सिमेंटच्या मसाल्याऐवजी एखादे केमिकल वापरून पाहा व दोन टाईलदरम्यान थोडे अंतर ठेवा(जॉइन्ट) जे अनेक लोक वाईट दिसते म्हणुन टाळतात परंतु टाइलस मध्ये असे अंतर ठेवल्यामुळे उन्हाळ्यामध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते आणि त्या जागेवरb पक्क्या रहातात. लोकहो, आपल्या सगळ्यांना सौंदर्य आवडते परंतु घरासाठी अधिक महत्त्वाचा असतो तो टिकाऊपणा, जे प्रत्येक स्थापत्य अभियंत्याने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. घराच्या वेगवेगळ्या भागांना जोडणाऱ्या सर्व सांध्यांची म्हणजेच स्तंभ व दोन खोल्यांच्या मधला भाग, तुळई व भिंती यांच्या दरम्यानचा भाग, स्लॅब व भिंती यांच्यादरम्यानच्या भागांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे व या भागांचे प्रसरण व आकुंचन सहन करण्यासाठी प्लास्टिसायझरचा (केमिकलचा) वापर केलाच पाहिजे. बांधकाम आधीच पूर्ण झाले असेल, तर तुम्ही हे सांधे पुन्हा उघडून त्यामध्ये असेb केमिकल किंवा तंतुमय पदार्थांवर आधारित मसाला भरू शकता व पुन्हा तो भाग नीटनेटका करू शकता. हे काम खार्चिक असले तरीही याच सांध्यामधून येत्या पावसाळ्यामध्ये पाणी येणार आहे व त्यामुळे ओल लागणे व पाणी झिरपण्यासारखे प्रकार होणार आहेत, जो खरेतर तुमच्या घरावरील उन्हाळ्यातील उष्णतेचा परिणाम आहे. त्याचप्रमाणे, इमारतींचा बाह्यभाग रंगवतानाही उष्णता परावर्तित करणाऱ्या रंगांचा वापर करा ज्यामुळे घरांच्या आतील भाग थोडा थंड राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यातील उष्णतेचा आणखी एक परिणाम होणारा आणखी एक घटक म्हणजे नळजोडणीसाठी वापरले जाणारे पीव्हीसी पाईप, जे आपले सांडपाणी, पाणी व अगदी आपल्या विविध विजेच्या तारा वाहून नेण्यासाठीही वापरले जातात. उष्णतेमुळे या पाईपचे जोड बिघडू शकतात ज्यामुळे सांडपाणी किंवा पाण्याच्यासंदर्भात या जोडातून गळती होऊ शकते, म्हणूनच वेळोवेळी देखभालही अत्यावश्यक आहे. विजेच्या तारांवरील आवरणही वितळू शकते कारण आतील तांब्याच्या तारा वीज प्रवाहामुळे आधीच तापलेल्या असतात व बाहेरील उष्णतेमुळे आगीत तेल ओतण्याचेच काम केले जाते ज्यामुळे बाहेरील आवरण वितळते व शॉर्ट सर्किट होऊ शकते. हे दोष कमी करण्यासाठी अधिक जाड गेजचा पाईप वापरता येऊ शकतो व यासाठीही वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असते जे बहुतेक सोसायट्या करत नाहीत व कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करतात, प्रत्यक्षात मात्र तसे नसते. त्याचवेळी उन्हाळ्यातील उष्णतेमुळे वाळवीसारख्या कीटकांमध्ये वाढ होते किंवा त्यांच्या जीवनाला चालना मिळते व ते लाकडी काम व पीओपी खराब करू शकतात, म्हणूनच आपल्या घरात जेथे थोड्याशाही प्रमाणात लाकूडकाम करण्यात आलेले आहे तेथे ठराविक काळाने वाळवी-प्रतिबंधक उपाययोजना करू घेणे, तसेच व्यावसायिक संस्थांकडून तपासून घेणे महत्त्वाचे आहे. वाळवीवर अतिशय बारीक लक्ष ठेवा कारण अनेकदा कर्करोगाप्रमाणे, तुम्ही पहिल्याच टप्प्यामध्ये बरेच नुकसान वाचवू शकता, जे नंतर प्रत्येक टप्प्यागणिक वाढत जाते. म्हणून उन्हाळ्यामध्ये घरातल्या कुठल्याही लाकडी वस्तुंभोवती पांढरी भुकटी दिसण्यासारख्या लहान गोष्टी घडल्यास, त्याचा तातडीने तपास केला पाहिजे व त्यावर उपचार केला पाहिजे.
मित्रहो, आपले घर हे आपल्या शरीरासारखे असते व ते दोन गोष्टींवर चालते, एक म्हणजे प्रतिकारक्षमता म्हणजेच तंदुरुस्ती निर्माण करणे व दुसरे म्हणजे नियमितपणे तपासण्या करणे व त्यातील जे काही निष्कर्ष आहेत ते योग्यप्रकारे मोजणे. म्हणूनच, घाबरून जाण्याऐवजी किंवा एखाद्या संस्थेला दोष देण्याऐवजी या क्षेत्रातील व्यावसायिकांकडून मदत घ्या व केवळ त्याच्या/तिच्या सल्ल्याप्रमाणेच वागा. शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तुमच्या इमारतीभोवती जास्तीत जास्त देशी झाडे (कडुनिंब, आंबा, बहावा इत्यादी) लावण्याचा प्रयत्न करा कारण तुमच्या आजूबाजूचा परिसर अगदी कडक उन्हाळ्यातही थंड ठेवण्याचा तो एक मार्ग आहे व त्यासाठी आधी प्रत्येक चौरसफुट क्षेत्र स्वतःसाठीच वापरण्याचा हव्यास कमी करा व थोडी जागा झाडांसाठीही ठेवा. दरवर्षी उन्हाळा कडकच होत जाणार आहे व त्यासाठी आपणच दोषी आहोत व जर आपल्याला उष्णतेच्या लाटेपासून स्वतःला वाचवायचे असेल तर उन्हाळ्यातील तापमान कमी करण्याचे कामही आपणच करू शकतो, असा इशारा देऊन निरोप घेतो!
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
www.sanjeevanideve.com








टिप्पण्या